"माझे
माहेर
पंढरी,
आहे
भीवरेच्या
तीरी"...दरवर्षी
आषाढी
एकादशी
जवळ
आली
की
या
ओळी
मनात
रुंजी
घालतात.
या
गाण्यात
जसे
वर्णन
आहे
तशाच
प्रकारे
आपले
सर्व
संत
पंढरपुरास
'माहेरघर'
असे
संबोधतात.
कारण
त्यांच्यासाठी
पंढरपूरचा
विठोबा
म्हणजे
'त्वमेव
माता
च
पिता
त्वमेव,
त्वमेव
बंधूश्च
सखा
त्वमेव'!
याच
विठूरायाला
केंद्रस्थानी
ठेऊन
उदयास
आला
तो
'वारकरी
संप्रदाय’!
तेराव्या
शतकात
भक्ती
चळवळीतून
विठ्ठल
भक्त
पुंडलिक
याने
वारकरी
संप्रदायाची
सुरुवात
केली.
त्यानंतर
सुमारे
५००
वर्षे
ज्ञानेश्वर,
तुकाराम,
एकनाथ,
नामदेव
अशा
निरनिराळ्या
संतांनी
आपल्या
थोर
कार्यातून
भागवत
धर्म
सर्वसामान्यांपर्यंत
पोचवला.
स्त्री-पुरुष,
जात-वंश
हा
भेदभाव
नसणारा
आणि
कोणतेही
कर्मकांड
विरहीत
असा
भागवत
धर्म
महाराष्ट्रात
बहुसंख्य
प्रमाणात
स्वीकारला
गेला.
त्यामुळे
विठुराया
म्हणजे,
जातपात
अथवा
गरीब-श्रीमंत
असा
कोणताही
भेदभाव
न
करणाऱ्या
देवाचे
महाराष्ट्राच्या
तमाम
जनमानसात
रुजलेले
स्वरूप!
या
देवावर
निस्सीम
भक्ती
आणि
आपल्या
कर्तव्यावर
पूर्ण
निष्ठा
ही
या
पंथाची
प्रमुख
तत्वे
आहेत.
याचबरोबर
यांची
सर्वांत
महत्वाची
परंपरा
म्हणजे
'वारी'!
वारंवार
केली
जाते
ती
'वारी'
आणि
वारी
करणारा
म्हणजे
'वारकरी'!
या
दोन्ही
शब्दांची
इतकी
साधी
व्युत्पत्ती
आहे.
पण
आज
८००
वर्षे
अखंड
चालू
असलेल्या
परंपरेमुळे
या
शब्दांप्रती
आपल्या
सर्वांच्याच
मनात
अपार
आस्था
असते.
वारकरी
म्हटले
की
डोळ्यापुढे
येतात
ती-
खांद्यावर
भगवी
पताका
व
गळ्यात
तुळशीची
माळ
धारण
करून
टाळ-मृदुंगाच्या
संगतीने
हरिनामाचा
गजर
करणारी
साधी
माणसे.
पण,
या
बाह्य
गोष्टींपेक्षा
त्यांच्या
मनात
असलेली
पांडुरंगावरील
अपरंपार
श्रद्धा
अधिकच
प्रभावकारी
ठरते.
त्यांच्या
याच
श्रद्धेमुळे
गेली
८००
वर्षे
अनेक
राजवटी
आणि
परकीय
आक्रमणे
यांना
टक्कर
देत
वारीची
परंपरा
भक्कमपणे
उभी
आहे.
वारी
हा
केवळ
शारीरिक
नव्हे
तर
मानसिक
आणि
अध्यात्मिक
पातळीवरचा
प्रवास
असतो.
गेली
अनेक
शतके
असे
लाखो
वारकरी
एकाच
ध्येयाने
प्रेरित
होऊन
हा
प्रवास
अविरतपणे
करत
आले
आहेत.
हे
सर्व
जण
म्हणजे
खऱ्या
अर्थाने
आपल्या
संस्कृतीचे
वाहक
आहेत.
दरवर्षी
आषाढ
व
कार्तिक
अशा
दोन
प्रमुख
वाऱ्या
असतात
व
त्याचबरोबर
चैत्री
व
माघी
वारी
ह्या
देखील
केल्या
जातात.
पण
आषाढ
वारीचे
महत्व
सर्वांत
जास्त
असते.
कारण
आषाढी
एकादशी
हे
सगळ्यात
महत्वाची
समजली
आहे.
याला
'देवशयनी
एकादशी'
असे
देखील
म्हणतात
कारण,
या
दिवसानंतर
विष्णू
चार
महिने
निद्रावस्थेत
असतो
असे
मानले
जाते.
त्यापूर्वी
त्याचे
दर्शन
घ्यायचे
म्हणून
सर्व
भक्त
पंढरपुरास
जातात.
यानंतर
कार्तिकी
एकादशीला
विष्णू
पुन्हा
जागा
होतो,
म्हणून
त्या
दिवसाला
'प्रबोधिनी
एकादशी'
म्हटले
जाते.
या
दोन
दिवसांच्या
मधील
चार
महिन्यांचा
काळ
'चातुर्मास'
म्हणून
संबोधला
जातो,
या
काळात
विवाहमुहूर्त
नसतात.
आपल्याकडील
परंपरेनुसार
ज्येष्ठ
महिन्यात
शेतीतील
पिकांची
पेरणी
होते,
आषाढात
देव
निद्रेस
जातात,
अश्विन
महिन्यात
पिकांची
तोडणी
होऊन
कार्तिकात
जेव्हा
मळणी
होते
तेव्हा
देवोत्थानाची
वेळ
येते.
शेतीच्या
कामांमध्ये
पूर्ण
लक्ष
घालता
यावे
यासाठी
कदाचित
देवशयनीची
संकल्पना
सुरु
झाली
असेल.
याचबरोबर
अनेक
लोक
चातुर्मासात
काही
ना
काही
नेम
पाळतात.
जर
एखादी
गोष्ट
सलग
४
महिने
केली
तर
निश्चितच
त्याची
सवय
होते.
चांगल्या
सवयी
अंगीकारणे
हाच
या
मागचा
उद्देश
असावा.
आता
याहीवर्षी
येणाऱ्या
आषाढी
एकादशीनिमित्त
वारकरी
पंढरपुरात
दाखल
होतील.
विठूनामाच्या
गजराने
सर्व
आसमंत
भरून
जाईल.
सुबोधता
किंवा
साधेपणा
हा
आपल्या
संतांच्या
शिकवणीचा
गाभा
आहे
आणि
वारकरी
याच
साधेपणाचे
प्रतिक
आहेत.
वारकऱ्यांच्या
भक्तीला
असणारी
भाबडेपणाची
जोड
त्यांना
निराळ्याच
अध्यात्मिक
उंचीवर
नेऊन
ठेवते.
तेथे
प्रत्येक
जण
स्वत्व
विसरून
पांडुरंगाशी
एकरूप
होतो
आणि
मग
देवळातील
विठोबाच
या
भक्तांच्या
चेहऱ्यावर
प्रकटतो.
विठ्ठलाचे
स्मरण
करताना
नकळत
या
भक्तांपुढे
देखील
हात
जोडले
जातात.
भागवत
धर्माच्या
शिकवणीनुसार,
आपण
प्रपंचातील
लोभाचा
त्याग
करून
परमार्थाची
वाट
धरली
कि
मोक्षप्राप्ती
होते
असे
म्हणतात.
वारकरी
आपले
घरदार
सोडून
पंढरपुरी
येतात,
देवाशी
एकरूप
होऊन
मोहाकडून
मोक्षाकडे
त्यांचा
प्रवास
सुरु
होतो.
आपल्या
सर्वांना
जरी
वारी
करणे
शक्य
नसले
तरीही
संतांचे
आचार-विचार
तर
नक्कीच
आचरणात
आणू
शकतो.
स्वतःमध्येच
गुंतून
न
राहता
आपल्या
पलीकडच्या
जगाचादेखील
विचार
करता
आला
तर
संतांची
शिकवण
आपल्याला
काही
अर्थाने
तरी
समजली
असे
म्हणता
येईल
व
याचबरोबर
आपला
प्रपंच
देखील
अधिक
आनंदमय
होईल.
"अवघाची
संसार
सुखाचा
करीन,
आनंदे
भरीन
तिन्ही
लोक!”
सलील
सावरकर
-
+९१-९८२३९-००३१८
अनुजा
जोगदेव
- +९१
८९७५७६७५९९