- ॐ भूर्भुवः स्वः । तत्सवितुर्वरेण्यं
- भर्गो देवस्यधीमहि । धियो यो नः प्रचोदयात् ॥
- (संपूर्ण
विश्वाला प्रकाशित करणाऱ्या
उगवत्या सूर्याचे आम्ही ध्यान
करतो,
जो
आमच्या मनावर प्रकाश टाकून
बुद्धीला प्रेरणा देईल.)
- वेदांमधील सर्वांत मान्यताप्राप्त आणि प्रचलित असा हा ‘गायत्री मंत्र’ आपल्या सर्वांनाच लहानपणापासून ज्ञात असतो. हा मंत्र उगवत्या सूर्याला समर्पित केला गेला आहे. ‘सूर्य’ हा आपल्या हि आपल्या पृथ्वीची प्रेरक ऊर्जा आहे. त्याच्या अस्तित्वामुळे आपले अस्तित्व आहे. निसर्गातील ऋतुचक्रापासून ते आपल्या दिनक्रमापर्यंत सर्व गोष्टी या सूर्यावर अवलंबून असतात. त्यातून भारतीय उपखंड हा उष्णकटिबंध प्रदेश असल्यामुळे आपल्याइथे वर्षातील जवळ जवळ ८ महिने स्वच्छ सूर्यप्रकाश असतो. त्यामुळे प्राचीन काळापासूनच भारतवर्षात सूर्य हा जीवनातील सर्वोच्च महत्त्व असलेला घटक आहे. वैदिक काळापासूनच भारतवर्षात सूर्याची उपासना केली जाते. तसेच आर्यावर्तातील राजे स्वतःला सूर्यवंशी मानत असत. त्यामुळे आजपासून सुरु झालेला कालखंड हा भारतीय उपखंडात शुभ मानला जातो... कारण आजचा दिवस म्हणजे उत्तरायण प्रारंभ!
- उत्तरायण म्हणजे सूर्याचे दक्षिण गोलार्धातून उत्तरेकडे होणारे संक्रमण... आपल्याला माहित आहे, कि पृथ्वीचा अक्ष एका बाजूस कलला आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे आपल्याला अनुभवता येणारे ऋतुचक्र! खगोल शास्त्रानुसार २२ डिसेंबर म्हणजे उत्तर गोलार्धातील सर्वात मोठी रात्र, कारण या दिवशी सूर्य हा दक्षिण गोलार्धातील मकर वृत्तावर असतो. त्यामुळे उत्तरेकडे हिवाळा असतो. त्यानंतर सूर्याचे उत्तरेकडे संक्रमण सुरु होते, दिवस मोठा होत जातो आणि हिवाळा संपून उन्हाळा सुरु होतो. आता दिवस जितका मोठा तितका जास्त वेळ सूर्यप्रकाश लाभणार! सूर्य हा ऊर्जेचा प्रमुख स्रोत असल्यामुळे अधिक सूर्यप्रकाश म्हणजे अर्थातच अधिक ऊर्जा लाभणार आणि आपली कार्यक्षमता वाढणार. तसेच आणखी एक कारण म्हणजे, पुराणांनुसार उत्तरायणाचे ६ महिने म्हणजे देवांचा दिवस आणि दक्षिणायनाचा कालखंड म्हणजे देवांची रात्र. त्यामुळे उत्तरायण हे आपल्याकडे शुभ मानतात. आता भारतीय संस्कृतीनुसार जेव्हा सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा उत्तरायण सुरु होते असे मानले जाते. त्यामुळे 'मकर संक्रांत' हा दिवस आपल्याकडे उत्तरायण आरंभदिन मानला जातो.
- बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की, आपले बाकीचे सणवार हे भारतीय महिन्यांनुसार असतात आणि ते ग्रेगोरियन कालगणनेला तंतोतंत जुळत नाहीत, परंतु संक्रांत मात्र दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारी याच दिवशी येते. याचे कारण म्हणजे आपल्या इतर सणांच्या तिथी ह्या चांद्रमासांवर अवलंबून असतात, तर संक्रांत मात्र सूर्याच्या भ्रमणावर अवलंबून असते. संक्रांत म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत होणारे स्थलांतरण! त्यामुळे खरेतर प्रत्येक महिन्यात एक संक्रांत येते. पण उत्तरायण प्रारंभ दिवस म्हणून मकर संक्रांत सर्वांत महत्वाची समजली जाते. त्यामुळे आजचा दिवस भारतीय उपखंडात मकर संक्रांती, माघी बिहू, लोहरी, पोंगल अशा निरनिराळ्या नावानी साजरा केला जातो. महाभारतामध्ये देखील या दिवसाचा उल्लेख आहे. पितामह भीष्मांनी आपला इच्छामरणाचा वर वापरून उत्तरायणाचा आरंभ झाल्यादिवशी आपले प्राण सोडले.
- आपल्याकडे महाराष्ट्रात मकर संक्रांतीला एकमेकांना तिळगुळ वाटण्याची प्रथा आहे. त्यानिमित्ताने जुन्या कटू आठवणी विसरून नवी गोड सुरुवात करण्याचा हा दिवस आहे असे आपण मानतो. खरेतर 'संक्रांत' या दिवसाच्या आपण एकमेकांना शुभेच्छा देत नाही. कारण 'संक्रांत येणे' हा वाक्प्रचार आपल्याकडे चांगल्या अर्थाने वापरला जात नाही. परंतु, भारतात इतर ठिकाणी ‘उत्तरायण आरंभ दिन’ यामुळे हा दिवस शुभ मनाला जातो. उत्तरायण म्हणजे शुभ काळाचा प्रारंभ म्हणून भारतभर ठिकठिकाणी या निमित्ताने माघ मेळा, गंगासागर मेळा, मकर मेळा असे मेळे भरतात. तसेच दर १२ वर्षांनी मकर संक्रांतीच्या दिवशी प्रयाग येथे कुंभ मेळा आयोजित केला जातो. उत्तर भारतात अनेक ठिकाणी या दिवशी पहाटे नदीत स्नान करून सूर्याचे पूजन करण्याची प्रथा आहे. दक्षिण भारतात या दिवशी 'पोंगल' या गोड भाताचा नैवेद्य दाखवतात व कापणीचा हंगाम यशस्वीपाने पार पडला म्हणून सूर्याकडे कृतज्ञता व्यक्त करतात.
- मकर
संक्रांत,
बिहू,
पोंगल...
ही
नावे जरी निराळी असली तरीही
आज आपण साजरे करतो ते म्हणजे
सूर्याचे उत्तर गोलार्धाकडे
होणारे संक्रमण!
सूर्य,
पृथ्वी,चंद्र
असे विश्वातील सर्वच घटक
आपापल्या गतीने स्थलांतरण
करत असतात.
गतिमान
असणे हा या विश्वाचा स्थायीभाव
आहे आणि त्यामुळेच या सृष्टीला
अर्थ आहे.
उत्तरायण
हे शुभ अशासाठी की वर नमूद
केल्याप्रमाणे सूर्याच्या
स्थलांतरामुळे आपल्याकडील
दीर्घकाळ चालणाऱ्या अंधाऱ्या
रात्री संपून मोठे होत जाणारे
दिवस येणार आहेत.
जसे
सूर्याचे संक्रमण अधिकाधिक
प्रकाश देणारे आहे तसेच आपले
मन अधिकाधिक सकारात्मक उर्जेकडे
स्थलांतर करत राहूदेत.
आपल्या
सर्वांच्या जीवनातील संक्रमण
हे सदैव चांगल्या गोष्टींकडे
व्हावे हीच या तेजोनिधीकडे
प्रार्थना!
सलील सावरकर- +६५ ८४३६०३४३अनुजा जोगदेव- +९१ ८९७५७६७५९९
We wish to communicate the rich aesthetic thoughtfulness behind every Indian festival! Saleel Savarkar Anuja Jogdeo
Sunday, 14 January 2018
उत्तरायण
Subscribe to:
Posts (Atom)