Saturday, 26 August 2017

आनंदोत्सव!!!

          

                             

         
          दरवर्षी आपण ज्याच्या येण्याची आतुरतेने वाट पाहतो तो पाहुणा आपल्या घरी आला आहे आणि या दहा दिवसांच्या आनंदोत्सवाची सुरुवात झाली आहे. आपल्या सर्वांनाच तो अगदी जवळचा वाटतो जणू काही आपल्या घरातीलच एक व्यक्ती असावी, त्याचे आगमन आपल्या घरात निराळेच चैतन्य आणते. जर आपण असे मानले कि माणसानेच हे निरनिराळ्या प्रकारचे देव निर्माण केले आहेत, तर त्यामध्ये 'गणपती' ही निर्विवादपणे सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे. 'सोंडेची वक्राकार रेष' ही गणपतीच्या आकृतीचे प्रतिनिधित्व करते आणि ही वक्राकार रेषा आपल्याला निसर्गात अनेक ठिकाणी आढळून येते. म्हणूनच गणपती हा खरोखर सर्वव्यापी देव आहे. एक सोपी वक्राकार रेघ, पण त्यामागची संकल्पना किती व्यापक आहे! आता ज्या देवाची आकृतीच सर्जनशीलतेचे आणि सौंदर्याचे प्रतीक आहे तर तो देव कलाकारांचा अर्थातच लाडका असणार! त्यामुळे गणपती हा बुद्धी आणि कला यांचा सुरेख मेळ आहे.
           कलाकारांचा आवडता देव गणपती आहे याचे आणखी एक कारण म्हणजे गणपतीचे स्वरूप निरनिराळ्या प्रकारांना अनुकूल आहे. पुरातन कालीन माहितीनुसार गणपतीचे एकूण ३२ प्रकार आहेत. त्यात बाल-गणेश, वीर-गणेश, भक्ती-गणेश किंवा नृत्य-गणेश अशा अनेक प्रकारांची नोंद आढळते. बदलत्या कलेच्या शैलीनुसार गणपतीचे प्रत्येक ठिकाणी निराळे स्वरूप असते. त्यामुळे अगदी जुन्या काळातील मंदिरांमधील मूर्ती, शिल्पे व चित्रे ते आजच्या काळातील ‘Modern Ganesha’, प्रत्येक कलाकार आपल्या आवडीनुसार गणपतीला चित्रित करतो. शैलीचे स्वातंत्र्य आणि पावित्र्याचे बंधन अशा स्वरुपात गणपतीचे निरनिराळ्या प्रकारात चित्रीकरण केले जाते. त्यातले कोणते स्वरूप अधिक चांगले आहे यापेक्षा महत्वाचे हे आहे की प्रत्येक प्रकारात गणपतीच्या स्वरूपाचे पावित्र्य आणि सौंदर्य कायम राहते. ही गोष्ट म्हणजे गणपतीच्या स्वरूपाच्या सर्जनशीलतेचा पुरावा आहे. गणपतीमधील आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव! भोवतालच्या जगात कोठेच न सापडणारे ते भाव आपल्याला आपल्या बाप्पाच्या डोळ्यात दिसतात. कळत नकळत आपण सर्वच त्याच्या निरागसतेसोबत जोडले जातो. म्हणून आपल्याकडे गणपती हा अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांचा लाडका असतो. आपल्याला तो कायम आपला सखा-सोबती असल्यासारखा वाटतो.
           पुरातन काळापासून गणपतीला 'विघ्नहर्ता' असे संबोधले जाते. तसेच देवासुरांच्या युद्धात तो देवांचा सेनापती होता असे मानतात. महाभारतासारखे महाकाव्य लिहिण्यासाठी लेखनिक म्हणून श्री व्यास ऋषींनी गणेशाचीच निवड केली आणि त्याने ते कार्य यशस्वीपणे पार पाडले. बुद्धीचा व कलेच देव, चौसष्ठ कलांचा अधिपती व गणांचा अधिपती अशा अनेक विशेषणांनी त्याची महती गायली जाते. आपल्याकडे सर्वात जास्त पूजिला जाणारा देव म्हणजे गणपतीच आहे. केवळ भारतातच नाही तर नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड सारख्या देशात फार पूर्वीपासून हा देव पूजिला जातो. आपण हाती घेतलेल्या प्रत्येक शुभ कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा करतो.
               गणपती खऱ्या अर्थाने आपल्या सर्व समाजाला संघटीत करणारा देव झाला ते लोकमान्य टिळकांमुळे! शिवाजी महाराजांच्या काळापासूनच आपल्याकडे प्रत्येक घरात भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात गणपती बसत असे. पण ब्रिटीशांचे राज्य आल्यावर या प्रथेचा राजाश्रय नाहीसा झाला. तसेच त्याच वेळी ब्रिटीशांनी स्थानिक लोकांना एकत्र येऊन सभा भरवणे किंवा काही कार्यक्रम करण्याची
बंदी घातली होती. पण लोकमान्यांनी यावर एक युक्ती योजिली, त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. देवघरातील गणेशाची भर चौकात प्राणप्रतिष्ठा करणे हा विचारच फार अभिनव आणि क्रांतिकारी होता. पण त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्तानी १० दिवस सर्व स्तरातील लोक एकत्र येऊ लागले. सर्व एकत्र जमून सभा घेऊ लागले, ब्रिटीश विरोधी कारवाया आखू लागले. याला धार्मिक महत्व असल्यामुळे ब्रिटीशांना यावर बंधनही घालता आले नाही. अशाप्रकारे एका लोकव्यापी चळवळीची सुरुवात झाली आणि गणेशोत्सवामुळे लोकांना संघटन शक्तीची जाणीव झाली. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर या उत्सवाचे स्वरूप बदलत गेले. आजच्या काळात जगभरात गणेशोत्सव साजरा करतात. प्रत्येक ठिकाणी तेथील मराठी माणसे एकत्र जमून निरनिराळे कार्यक्रम करतात, लोकांच्या कलागुणांना वाव मिळतो. त्यामुळे गणपती हा आपल्या सर्वांना बांधून ठेवणारा धागा आहे. आपल्या संस्कृतीचा जतनकर्ता आहे. 'गणपती बाप्पा मोरया' चा गजर आपल्या सगळ्यांमध्ये नवे चैतन्य आणतो, आपल्या सर्वांना एकत्र जोडतो. वर्षातील हे १० दिवस आपल्यासाठी उत्साहाने भरलेले असतात.
           या आनंदोत्सवाची सांगता झाल्यावर अनंत चतुर्दशीला गणपतीला प्रेमाने निरोप देऊन त्याच्या मूर्तींचे विसर्जन करतात. त्या प्रथेमागेदेखील एक अध्यात्मिक विचार आहे. गणपती हा उर्जेच्या चक्राचे प्रतिनिधित्व करतो असे मानले जाते. ऊर्जा चक्र हे इतर सर्व चक्रांचा पाया आहे. आपल्या सर्वांना माहित असलेल्या उर्जेच्या सिद्धांतानुसार ऊर्जा कधीच नष्ट होत नाही, तिचे एका प्रकारातून दुसऱ्यात हस्तांतरण होते. त्यामुळे गणपतीची मूर्ती विसर्जित झाली तरी ते तत्व, ती ऊर्जा मात्र चिरंतन टिकून राहते. अशाप्रकारे त्यानंतर केवळ मूर्तीत अडकून न राहता त्यापलीकडील असा मूर्ततेकडून अमूर्ततेकडे आणि सगुणाकडून निर्गुणाकडे जाणारा आपला प्रवास सुरु होतो.
                                                                                                 
                                                                                                         सलील सावरकर- +९१ ९८२३९००३१८
अनुजा जोगदेव- +९१ ८९७५७६७५९९


9 comments:

  1. Chhan.....Anuja tuze sketches pan aavadle aste....Ganpati che prakar shabda barobar chitra ne pan dakhavle aste tar "sone pe suhaga" zala asta....mastach....

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you very much!😊 Sketches chi idea chhan ahe, will try to incorporate next time!

      Delete
  2. Excellent stuff Anuja.......

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you Dada!😊 But credit goes to Saleel as well! This is team work!

      Delete
  3. अप्रतिम रेखाटन व आभ्यासु लेखन...very good Anuja

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you very much!😇 Equal credit goes to my friend Saleel😊

      Delete
  4. खूप छान 👌👍

    ReplyDelete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete