आदौ राम तपोवानदी
गमनं हत्वा मृग कांचनमं
वैदेही हरणं
जटायू मरणं सुग्रीव संभाषणं ||
वाली निग्रहणं
समुद्र तरणं लंकापुरी दाहनं
पश्चात रावण
कुंभकर्ण हननं एतध्दी रामायणं||
(एक श्लोकी रामायण- कवी तुलसीदास)
कवी तुलसीदास
यांनी एका साध्या सोप्या श्लोकामधून रामायणाची गोष्ट सांगितली आहे, ज्यामुळे यातील ठळक घडामोडी चटकन लक्षात राहतात. मुळचे वाल्मिकी रामायण म्हणजे २४,००० श्लोकांएवढा विस्तार असलेले महाकाव्य आहे. प्राचीन कालीन वाङ्मयतील प्रतिभा, सर्जनशीलता यांची सर्वोत्कृष्ट उदाहरणे म्हणजे रामायण
व महाभारतासारखी काव्ये! ही काव्ये म्हणजे आपल्या संस्कृतीचा पाया आहेत. भारतीय म्हणवणाऱ्या प्रत्येकाला हि माहित असतात. कारण आपल्या आजी आजोबांकडून यातील गोष्टी ऐकतच आपण लहानाचे मोठे झालो असतो.
भारतीय वाङ्मयतील
सर्वांत प्राचीन काव्य म्हणून रामायणाला 'आदि काव्य' असेदेखील म्हणतात. संपूर्ण रामायण 'अनुष्टुप' छंदातील
श्लोकांमध्ये लिहिले आहे. यात एकूण ७ कांड
आहेत- बाल कांड, अयोध्या कांड, अरण्य कांड, किष्किंधा कांड,
सुंदर कांड, युद्ध कांड व उत्तर कांड. यातील बाल कांड व उत्तर कांड म्हणजे मूळ वाल्मिकी रामायणाचा
भाग नसून नंतर लिहिले गेले असे तज्ञांचे म्हणणे आहे. एकात एक गुंफलेल्या कथा म्हणजे त्या काळातील समाजजीवनाचे चित्रण व प्राचीन
ऋषींची शिकवण यांचा मिलाफ आहे. उत्तर भारतातील
पूर्व भागातील संस्कृती,सामाजिक जीवन आणि
शहरीकरण याचे प्रतिबिंब रामायणात पाहायला मिळते.
भारतीय संस्कृतीत राम हा विष्णूचा सहावा अवतार मनाला जातो. त्रेतायुगामध्ये चैत्र शुद्ध नवमीला इक्ष्वाकु कुळात प्रभू
रामचंद्रांचा जन्म झाला. त्यांचा
जीवनप्रवास म्हणजे रामायण! आपल्याकडे
श्रीराम म्हणजे 'मर्यादापुरुषोत्तम' असे मानले जाते.
मुळात 'आदर्शवाद' हा रामायणाचा गाभा आहे. आदर्श राजा- राम, आदर्श पत्नी- सीता, आदर्श बंधु- लक्ष्मण व भरत, तर आदर्श दूत- हनुमान अशी अनेक
उदाहरणे यात पाहायला मिळतात. 'रामराज्य' म्हणजे सर्वांत परिपूर्ण प्रशासन असे मानले जाते. तसेच कितीही संकटे आली तरी शेवटी सद्गुणांचाच वाईट
प्रवृत्तींवर विजय होतो हे यात वारंवार सांगितले आहे. आजच्या जगात चांगल्या गोष्टी टिकून राहण्यासाठी हा आदर्शवाद
काही प्रमाणात आवश्यक आहे.
रामायणाची गोष्ट आपल्या जीवनातील निर्णय किंवा निवडीचे महत्त्व अधोरेखित करते. आपण कशाची निवड करतो यावर आपले पुढचे आयुष्य अवलंबून असते. असे म्हणतात की ‘You are always one decision away from an entirely different life’. रामायणातील
पात्रांच्या बाबतीत हे वाक्य अगदी खरे ठरते. सर्वांची आयुष्ये एकेका निर्णयामुळे पूर्णतः बदलतात. एकीकडे युवराज राम पित्याच्या वचनासाठी राज्यत्याग करून
वनवासी होतो तसेच सीता व लक्ष्मण देखील आपले वैभव सोडून त्याला साथ देतात. तसेच भरत बंधुप्रेमापोटी राज्य न स्वीकारता तपस्वी होतो. तर दुसरीकडे रावणासारखा बलाढ्य योद्धा रणांगणावर मृत्यूला
समोर जातो. कुंभकर्ण व
विभीषण दोघेही रावणाचेच भाऊ, पण दोघेही दोन
विरुद्ध मार्ग निवडतात. दोघांनाही ठाऊक
असते की रावण चुकीचे वागतो आहे. पण कुंभकर्ण रावणाची साथ न सोडता युद्धात मरण स्वीकारतो तर
विभीषण रामाला शरण जातो व त्याला युद्धात
सहाय्य करून नंतर लंकेचा राजा बनतो. यातील कोणाचे
बरोबर कोणाचे चूक यापेक्षा महत्वाचे हे आहे की यातील सर्व पात्रे आपापले स्वतंत्र
निर्णय घेतात आणि त्यांच्या आयुष्यातील बदलांना समर्थपणे न डगमगता सामोरे जातात.
आधुनिक काळात
काही जण रामायणावर टीका करतात, त्यातील पात्रे
परिपूर्ण नाहीत असे म्हणतात. पण मुळात राम-रावण म्हणजे देव-दानव असे न मानता रामायण म्हणजे उत्तर भारतीय आर्य संस्कृती व दक्षिणेच्या
लंकेतील संस्कृती यातील कलहाचे चित्रण अशा दृष्टीकोनातून त्याकडे पाहिले तर
आपल्याला ते जास्त चांगल्या प्रकारे ते समजू शकेल. वास्तविक या दोन्ही संस्कृती पुढारलेल्या होत्या, येथील राज्ये वैभवसंपन्न होती. दोन्ही राज्यांमध्ये युद्ध झाले व त्यात आर्यांचा विजय झाला. रामायणाची गोष्ट रामाच्या किंवा आर्यांच्या बाजूने लिहिली
आहे, त्यामुळे साहजिकच
राम हा कथेचा नायक आहे व तो मर्यादापुरुषोत्तम दाखवला आहे. पण त्याचबरोबर त्यातील बाकीच्या पात्रांचे पैलू देखील
अत्यंत बारकाव्याने दाखवले आहेत. म्हणूनच आपल्याला
ही सर्व पात्रे जवळची वाटतात. लोकांनी कितीही टीका केली तरी, आज दोन हजार वर्षे लोटूनसुद्धा रामकथेचा प्रभाव कायम आहे
आणि यातच रामायणाचे श्रेष्ठत्व आहे. त्यामुळे रामायण
हे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशा दर्जाचे अतिशय परिपूर्ण साहित्य आहे. ह्या आदिकाव्याचा प्रभाव केवळ भारतीय उपखंडच नव्हे तर
दक्षिण पूर्व आशियाई देशांवरही आहे. थायलंड, इंडोनेशिया, कंबोडिया, फिलिपिन्स अशा
सर्व देशात रामायणाला अत्यंत महत्त्व आहे.
अशा या रामायणावर
आज रामनवमीच्या निमित्ताने हा लेखनप्रपंच! आपल्यासाठी रामायण केवळ एक गोष्ट नसून आपल्याला जीवनमुल्ये शिकवणारे एक
तत्त्वज्ञान आहे. कारण कितीही वेळा
आपण रामायण वाचलेले असले तरी पुन्हा वाचताना त्यात आपल्याला नवनवीन गोष्टी उमजतात. लहानपणी राम-रावण युद्धाची
गोष्ट रंजक वाटते, तर मोठे झाल्यावर
त्यातील तत्वज्ञान आपल्याला समजू लागते. तसेच त्यातील पात्रांचे विविध पैलू आपल्याला समजतात त्याचबरोबर कर्तव्यानिष्ठा
व नैतिकता यांचे महत्त्व अधोरेखित होते. आजच्या घडीला मौखिक परंपरा, चित्रकला, शिल्पकला, संगीत-नृत्य-नाट्य, चित्रपट व पुस्तके अशा अनेक माध्यमातून रामायण एका पिढीतून
दुसऱ्या पिढीपर्यंत पोचत आहे. जे साहित्य स्थिर
न राहता सतत निरनिराळ्या भाषातून व माध्यमातून लोकांपर्यंत पोचत राहते तेव्हा ते
अजरामर होते. त्यामुळेच आपल्या
संस्कृतीत असे म्हणतात, जोवर या जगात
चंद्र-सूर्य आहेत तोवर
ही रामकथा टिकून राहील. रामायणाचा कधीही
न संपणारा प्रभाव पहिला की हे वाक्य अगदी तंतोतंत खरे आहे याची खात्रीच पटते!
सलील सावरकर- +६५ ८४३६०३४३
अनुजा जोगदेव- +९१ ८९७५७६७५९९