आत्ता जर आपण आपल्या आजूबाजूच्या निसर्गाकडे दृष्टीक्षेप टाकला, तर नवनिर्मितीचा अनोखा सोहळा पाहायला मिळेल. निसर्गाचे
एक ऋतुचक्र संपून पुन्हा नवे सुरु झाले आहे! ऋतुराज वसंताची
लागलेली चाहूल, झाडांना फुटलेली नवी पालवी, अमावास्येनंतर पुन्हा नव्याने उगवणारा चंद्र आणि याच सुमारास सूर्याचा
प्रथम राशीत म्हणजेच मेष राशीत होणारा प्रवेश... नव्या
वर्षाची सुरुवात करायला याहून अनुकूल परिस्थिती कोणती असू शकेल? निसर्गातील अशा या नवनिर्मितीचे चैतन्य माणसाने आपल्या संस्कृतीमध्ये आणले
आणि मग त्या चैत्र शुक्ल प्रतिपदेला नाव मिळाले, "गुढी
पाडवा”!
निसर्गाच्या प्रभावाबरोबरच गुढी पाडव्याच्या दिवसाला इतरही चित्तवेधक पैलू
आहेत. आपल्या प्राचीन वाड्ग्मयात देखील या दिवसाचा उल्लेख
आढळतो. ब्रह्म पुराणानुसार या दिवशी ब्रह्म देवाने सृष्टीची
निर्मिती केली आणि सत्ययुगाची सुरुवात झाली. तसेच याच दिवशी
भगवान विष्णू यांनी त्यांचा प्रथमावतार म्हणजेच मत्स्यावतार धारण केला आणि
पृथ्वीला प्रलयापासून वाचवून नवजीवन दिले. रामायणातील
संदर्भानुसार, श्रीरामांनी रावणवध करून आणि आपला वनवास
संपवून याच दिवशी अयोध्यानगरीमध्ये प्रवेश केला व रामराज्याची सुरुवात झाली. तसेच शालिवाहन राजाने त्याच्या
शत्रूंवर विजय मिळवून या दिवसापासून "शालिवाहन शक संवत्सराची" सुरुवात
केली. या सर्व
कारणांमुळे गुढी पाडव्याच्या दिवसाला आणखीनच महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळेच हा दिवस आपण साडेतीन मुहुर्तांपेकी एक मुहूर्त मानतो. तसेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार केला तर याच काळात रबीचा हंगाम संपतो व
नवा हंगाम चालू होतो. भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे ही
गोष्ट सुद्धा लक्षात घेण्याजोगी आहे. एकूणच या निरनिराळ्या
बाजूंनी पहिले असता हा काळ नूतन वर्षाची व नव्या गोष्टींची सुरुवात करण्यास अगदी
योग्यच आहे!
आजच्या
दिवसाची मुख्य परंपरा म्हणजे प्रत्येक घराबाहेर सर्वांना दिसेल अशा ठिकाणी उभारली
जाणारी गुढी! ही प्रथा का सुरु झाली यामागे दोन मतप्रवाह
आढळतात. एक म्हणजे, गुढ्या उभारून
अयोध्येतील लोकांनी श्रीरामांचे आगमन साजरे केले. परंतु
भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केल्यावर हे मत फारसे पटत नाही. कारण
गुढीची पद्धत ही मुख्यतः महाराष्ट्रीय किंवा मराठी लोकामध्ये आढळते. दुसरा मतप्रवाह जो महाराष्ट्रातील
गुढीच्या प्रथेचे समर्थन करतो, तो म्हणजे शालिवाहन राजाने
आपल्या शत्रूंवर मिळवलेला विजय! 'प्रतिष्ठान' म्हणजे सध्याचे 'पैठण' येथून
राज्यकारभार करणाऱ्या शालिवाहन राजाने या दिवशी आपल्या शत्रूंचा विनाश केला आणि
त्या विजयी दिवसाची आठवण म्हणून त्याच्या प्रजेने गुढी उभारण्यास सुरुवात केली.
कारण कोणतेही असले तरी शतकानुशतके प्रत्येक मराठी घरात ही गुढी
उभारली जाते. थोडक्यात काय, तर
आपल्यासाठी गुढी म्हणजे विजयाचे प्रतीक आणि नव्या गोष्टींची सुरुवात! विजयाच्या प्रतिकासोबतच ही गुढी म्हणजे जणू आपल्या संस्कृतीचा ध्वजच आहे.
काहींच्या मते ही गुढी उभारणे म्हणजे ब्रह्मदेवाचे स्मरण करणे,
त्यामुळे याला ‘ब्रह्मध्वज’ असेही म्हटले जाते. उंच काठीवरचे हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचे जरीचे वस्त्र, त्यावर आंब्याची व कडूनिंबाची डहाळी, फुलांचा हार व
साखरेची गाठी आणि सर्वात वर मंगल कलश! रंगीत फुलांनी आणि
कोवळ्या पालवीने बहरलेली झाडाची फांदी जशी आकर्षक दिसते, तसाच
भास या गुढी मध्ये होतो. नव्या वर्षाचा दिवस ठरवण्यापासून ते
त्या दिवासापासून नवी प्रथा सुरु करण्यापर्यंत निसर्गाने त्याचा प्रभाव पाडलेला
आहे हे यातून जाणवते. तसेच या दिवशी आपण प्रसाद म्हणून साखरेच्या गाठी खातो व त्याचबरोबर
कडूनिंबाची पाने देखील खातो, म्हणजेच सुख आणि दुःख या एकाच
नाण्याच्या दोन बाजू आहेत असे हा सण आपल्याला सांगतो!
आपले सण म्हणजे निरनिराळ्या गोष्टींची, मुल्यांची
प्रतिके आहेत असे मानले तर त्यात गुढी पाडवा म्हणजे "नवनिर्मिती"! कारण या काळात सुरु होणारा वसंत
ऋतू म्हणजे चैतन्य, उत्साह, आनंद आणि
अर्थातच नवनिर्मिती! आपण सर्व निसर्गाकडून नवनिर्मितीची
ऊर्जा घेऊ. नव्या कामांची सुरुवात उत्साहाने करून वसंताच्या
पालवीप्रमाणे नवे आचार-विचार अंगीकारु. रोजच्या एकसुरी जगण्याला समांतर असा नवनिर्मितीचाही प्रवास चालू ठेऊ.
आमच्या सर्व वाचकांना गुढी पाडव्याबरोबरच नवनिर्मितीसाठीसुद्धा
हार्दिक शुभेच्छा! तुमचे
नवे वर्ष वसंत ऋतूप्रमाणे आनंददायी आणि उत्साह्वर्धक ठरो हीच सदिच्छा!
या लेखाचा शेवट करताना 'डॉ. प्रकाश बाबा आमटे' या चित्रपटातील ' तू बुद्धी दे' या गाण्याच्या ओळी मनात येत आहेत.
तशीच प्रार्थना आपण निसर्गाकडे करू आणि ती प्रत्यक्षातदेखील आणू...
'तू बुद्धी दे, तू तेज
दे; नवचेतना, विश्वास दे; जे सत्यसुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे!’
सलील सावरकर- ९८२३९००३१८
अनुजा जोगदेव- ८९७५७६७५९९
Chhan mahiti....shabd rachana surekh....fakt ek prashna....Ram kartik amavasyela Ayodheyt paratale hote ki chaitra pratipadela?
ReplyDeleteYa vishayi mahiti kuthun milali?
Thank you very much😊
DeleteRegarding your query, we have read about that in a book (Sampurna Chaturmas by Mr.V.K.Phadake)as well as on internet
. As we have mentioned in the article, there is always some opinion difference.
Chhan mahiti....shabd rachana surekh....fakt ek prashna....Ram kartik amavasyela Ayodheyt paratale hote ki chaitra pratipadela?
ReplyDeleteYa vishayi mahiti kuthun milali?
Commendable efforts by Anuja & Saleel. Lots of efforts taken by you to compile the information about Gudi Padwa. Gr8 going. Keep it up !
ReplyDeleteThank you very very much for such a great response & encouragement!😊
DeleteAnuja & Saleel, commendable efforts by you to compile the information & script it beautifully well. Congratulations.
ReplyDeleteThank you very much for such nice words!😊 Means a lot to us!👍
Delete