Friday, 28 April 2017

सार्वकालिक.. शाश्वत.. चिरंतन!!


           'महाभारत'....आपल्या भारतभूमीवर घडलेले अजरामर महाकाव्य! वास्तववादावर आधारित असे आणि नातेसंबंध, मानवी स्वभाव यापासून ते धर्म- अर्थ- काम- मोक्ष व युद्धनीतीपर्यंत असंख्य गोष्टींवर भाष्य करणारे, व्यास ऋषींनी रचलेले हे महाकाव्य म्हणजे सर्वोत्कृष्ट साहित्याचे उदाहरणच आहे. गेली शतकानुशतके लोक महाभारतातील कथा वाचत आहेत, पुढच्या पिढ्यांपर्यंत ते पोचवत आहेत. आज या विषयी बोलायचे कारण हेच की आजच्या दिवशी म्हणजे वैशाख शुक्ल तृतीयेला व्यास मुनींनी महाभारताचा शब्दशः श्रीगणेशा केला! भारतवर्षाला अभिमान वाटेल अशा या चिरस्थायी कलाकृतीची सुरुवात आजच्या दिवशी केली गेली, त्यामुळे हा दिवस शुभ मानून साजरा करायला याहून मोठं कारण कोणते असू शकेल? आणि याचसोबत आजच्या दिवसाबरोबर निरनिराळ्या कथांचे धागे जोडले गेले आहेत की ज्यामुळे अक्षय्य तृतीयेचे महत्व अजूनच वाढले आहे व त्यामुळे आपण या दिवसाला साडेतीन मुहुर्तांमधील एक मुहूर्त मानतो.
           अक्षय्य तृतीयेसोबत जोडला गेलेला एक मोठा समज म्हणजे आज जर सोन्याची खरेदी केली तर ते सोने वाढत जाते व आपली भरभराट होते. यामागचे प्रमुख कारण म्हणजे आजच्या दिवशी भगवान विष्णुचे महत्व असते असे मानले जाते. पुराणानुसार विष्णु हा आपल्या विश्वाचा 'संरक्षक' आहे. म्हणजे जसा ब्रह्म देव हा सृष्टीचा निर्माता तसा विष्णु हा संरक्षणकर्ता! त्यामुळे आजच्या दिवशी आपण जी काही कार्ये करू त्याचे तो संरक्षण करतो व ती कायमस्वरूपी टिकवून त्यांची वाढ करतो असे समजले जाते. म्हणूनच आज विष्णु आणि लक्ष्मी यांची पूजा केली जाते. विष्णुपत्नी लक्ष्मीस आपण संपत्ती व समृद्धीची देवता मानतो. आपल्याकडे सोने हे संपत्तीचे सर्वोच्च प्रतीक आहे. त्यामुळेच आजच्या दिवशी सोने खरेदी करण्याची प्रथा सुरु झाली असावी, जेणेकरून संपत्तीची वाढ होत जाईल व घर समृद्ध होईल.
           आज विष्णूंचा सहावा अवतार 'परशुराम' यांची जयंती साजरी केली जाते. परशुराम हे अत्यंत पराक्रमी वीर तर होतेच परंतु त्याचबरोबर आपण त्यांना सप्तचिरंजीवांमधील एक मानतो. त्यामुळे परशुराम हा दशवातारांमधील एकमेव चिरंजीव अवतार आहे. याचबरोबर आजच्याच दिवशी भगीरथाने अथक तपस्या करून गंगेला पृथ्वीवर आणले. 'गंगा' ही अनेक वर्षांपासून भारतामधील लोकांसाठी सर्वात पवित्र नदी आहे. पण अशा नदीला पृथ्वीवर आणण्यासाठी भगीरथाला अनेक वर्ष तप करावे लागले आणि अखेरीस त्याचे प्रयत्न फळाला आले. या कथेवरून निर्माण झालेला ‘भगीरथ प्रयत्न' हा वाक्प्रचार तर आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे!
          अशा या निरनिराळ्या संदर्भातून या दिवसामागचा खरा अर्थ उलगडत जातो. व्यासांच्या विलक्षण बुद्धिमत्तेमुळे अजरामर झालेले महाभारत, किंवा पराशुरामाने आपल्या पराक्रमाने मिळवलेले चिरंजीवित्व अथवा भगीरथाला त्याच्या परिश्रमासाठी साक्षात ब्रह्म देवाकडून लाभलेली प्रशंसा व त्याच्या नावे तयार झालेला वाक्प्रचार, या सर्वांचा विचार केल्यावर लक्षात येते की आजच्या दिवसाला अक्षय्य तृतीया असे का म्हणतात! 'अक्षय' म्हणजे 'ज्याचा कधीही क्षय होत नाही असे' म्हणजेच 'जे चिरंतन टिकून राहते ते’! आजच्या दिवशी जे निर्माण झाले ते स्तुत्य तर ठरलेच पण त्यांची महती कायमस्वरूपी टिकून राहिली आहे. 'जे सर्वोत्कृष्ट असते ते सदैव टिकून राहतेच' अशी संकल्पना हा दिवस आपल्या मनात रुजवतो. या नश्वर जगातला अपवाद म्हणजे माणसाचे कर्तृत्व! एखाद्याची त्याच्या कर्मावर व त्याने स्वीकारलेल्या मार्गावर परम श्रद्धा असेल तर काळही त्याच्या कर्तृत्वाला चिरंतन ठेवण्यापासून रोखू शकत नाही. कदाचित याच गोष्टीची सर्वांना जाणीव करून देण्यासाठी म्हणून आपल्या पूर्वजांनी 'अक्षय्य तृतीया' हा दिवस राखून ठेवला असेल! जेणेकरून आजच्या दिवसापासून सर्व जण चांगल्या कामांचा संकल्प करून आपल्या कर्तृत्वरूपाने 'अक्षय' राहण्यासाठी कायम प्रयत्न करत राहतील.

सलील सावरकर- +९१ ९८२३९००३१८
अनुजा जोगदेव- +९१ ८९७५७६७५९९

3 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. Saleel and Anuja...Thanks for this..It's very important to know why we celebrate the festivals..Which mist of us don't know..U r doing great job

    ReplyDelete
  3. Salil ani Anuja..... Great job👍Mi Ram Navani ani Hanuman Jayanti chya divshi pan article expect karat hote.....tya baddal vishesh mahiti sangnya sarkha kahi nasava pan mahatva ahe na tyancha.....tumchya pahilya article pasunach apeksha vadhlya ahet☺all the best....

    ReplyDelete