“नमोSस्तुते व्यास
विशालबुद्धे फ़ुल्लारविन्दायतपत्रनेत्र
कमळाच्या पाकळीप्रमाणे
मोठे नेत्र असलेल्या आणि महाभारतासारख्या काव्याद्वारे ज्ञानाचा दीप प्रज्वलित
करणाऱ्या महर्षी व्यासांचे आम्ही वंदन करतो.
व्यासांना
समर्पित असलेला हा श्लोक भगवतगीतेच्या आरंभी असलेल्या श्लोकमालेतील एक आहे. हा श्लोक आज इथे
लिहिला कारण आजच्या दिवशी व्यास ऋषींची जयंती असते. व्यासांनी महाभारत लिहिले,पुराणे लिहिली व त्याचबरोबर वेदांचे विभाजन केले, असे आपण मानतो. त्यामुळे आपल्या
संस्कृतीमध्ये व्यासांना अतीव आदराचे स्थान आहे. 'भारतीय संस्कृतीचे आणि पुरातन वाड्मयाचे शिल्पकार' असे म्हणून आपण
त्यांचा गौरव करतो. महाभारताची
गोष्ट खरेच घडली कि नाही यापेक्षा ज्या व्यक्तीला हे महाकाव्य लिहिता आले तिची
बुद्धिमत्ता काय विलक्षण असेल हा विचार करणे जास्त महत्वाचे आहे. व्यासांच्या याच
बुद्धिमत्तेचा सन्मान म्हणून आपण त्यांना 'सर्वश्रेष्ठ गुरु' म्हणून संबोधतो आणि त्यांचा सन्मानार्थ आजचा दिवस 'गुरु पौर्णिमा' म्हणून साजरा करतो.
आपल्या भारतवर्षामध्ये
'बुद्धी' किंवा 'ज्ञान' हे सर्वोच्च स्थानी मानले जातात. कारण बुद्धी ही एकमेव गोष्ट आहे कि जी आपल्या कडून कधी कोणी
चोरू शकत नाही, जी वापरली
असता वाढते आणि न वापरल्यास नष्ट होते. आपल्यासाठी एक ज्ञानी माणूस हा कायमच उच्च आदरस्थानी असतो. त्यामुळे 'ज्ञान संपादन' ही आपल्यासाठी अन्न,वस्त्र,निवारा यांच्याबरोबरीने येणारी मुलभूत गरज आहे. म्हणूनच आपल्या आयुष्यातील ज्ञान संपादनाच्या प्रक्रियेत
मोलाची भूमिका बजावणाऱ्या गुरूंचे महत्व अद्वितीय असते.
‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः’ हा श्लोक तर आपल्या सर्वाना लहानपणापासूनच पाठ
आहे. या श्लोकाद्वारे आपल्या गुरूंची तुलना ब्रह्मा-विष्णु-महेश यांच्याशी केली
आहे. आपल्या ‘आई’ नंतर कदाचित गुरु हि एकमेव व्यक्ती असेल, जिला देवत्वाशी जवळ
जाण्याचा मान लाभला आहे!. पण आपण खोलात
जाऊन हा विचार कधी करत नाही कि गुरूंची तुलना या त्रिमुर्तींसोबत का केली जाते? याचे कारण म्हणजे, ज्याप्रमाणे ब्रह्मा-विष्णु-महेश हे अनुक्रमे सृष्टीचे निर्माता-संरक्षक-विनाशक आहेत, त्याचप्रमाणे गुरु हे आपल्या मनात शिक्षणाची आस निर्माण करतात, आपले ज्ञान टिकून
राहावे यासाठी प्रयत्न करतात आणि
त्याचबरोबर आपल्यातील अज्ञानाचा विनाश करतात ; म्हणून ते आपल्यासाठी 'परब्रह्म' असतात! दुसर्या बाजूने विचार केल्यावर असेही जाणवते, की हा श्लोक
म्हणजे एका अर्थाने गुरूंसाठी लिहिला गेलेला ‘फॉर्म्युला’ आहे. एका गुरूने कसे
असावे, हे तर यातून सांगण्याचा प्रयत्न नसेल ना?
गुरु हे केवळ
अध्यात्मिक किंवा शैक्षणिक स्तरावरचेच असायला हवे असे बंधन नसते. ज्या व्यक्तींकडून
आपल्या काही नवीन ज्ञान मिळते ते आपले गुरु असतात. मग ते आपले प्राध्यापक असो किंवा सहकारी किंवा आपल्या
रोजच्या आयुष्यातील माणसे. काहीवेळा
आपल्यापेक्षा लहान असणारी व्यक्तीसुद्धा आपल्याला बरेच काही शिकवून जाते. नवीन गोष्टी आत्मसात
करणे, ज्ञान संपादन
करून आपल्यात चांगले बदल घडवणे हे माणसाच्या प्रगतीचे लक्षण आहे. जे जे लोक आपल्याला
यासाठी सहकार्य करतात ते आपले गुरु असतात. फक्त माणसेच नाही तर आपल्या भोवतालची जीवसृष्टी आणि निसर्ग
हे सुद्धा आपले फार महत्वाचे गुरु आहेत. काहीवेळा एखाद्या थोर माणसांनी लिहिलेले एखादे पुस्तक आपल्या आयुष्याला नवी
दिशा देते. 'गुरु' या संकल्पनेमागचा
विचार असा आहे की जर आपल्याला एखादी व्यक्ती किंवा एखादी गोष्ट आपल्यापेक्षा
कर्तृत्वाने आणि ज्ञानाने मोठी वाटली तर आपण आपला अहंभाव दूर ठेऊन त्याला
गुरुस्थानी मानतो, त्यातील
चांगले गुण अंगीकारण्याचा प्रयत्न करतो. आपला अहंकार विसरून जेव्हा आपण एखाद्याला शरण जातो तेव्हाच आपल्याला नवीन
काहीतरी शिकायला मिळते. तसेच नवीन काही
शिकण्याची आस असेल तर कोणत्या कोणत्या
मार्गांनी आपल्याला ज्ञानप्राप्ती करता येतेच आणि आपल्याला योग्य असा गुरु
आपल्याला नक्की मिळतो. मग ते आपले
शाळेतील शिक्षक असतील किंवा एखादे पुस्तक किंवा आपले वरिष्ठ. आजचा दिवस हा अशा सर्व
गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असतो.
सलील सावरकर- +९१ ९८२३९००३१८
अनुजा जोगदेव- +९१ ८९७५७६७५९९
Chhan.... massst......
ReplyDeleteThank you very much :)
Delete