Monday, 25 September 2017

या देवी सर्वभूतेषु शक्तिरुपेण संस्थिता!


        

          अनादी अनंत काळापासून अस्तित्वात असलेली वैश्विक ऊर्जा म्हणजे 'शक्ती'...संपूर्ण विश्वाची जननी मानली जाणारी ही ऊर्जा 'आदिशक्ती' या नावाने संबोधली जाते. आदिशक्ती ह्या विश्वातील गतिमान चैतन्याचे प्रतिनिधित्व करते. आपल्या संस्कृतीतील सिद्धांतानुसार 'ब्रह्मा-विष्णु-महेश' हे जगाच्या मूलस्थानी आहेत आणि शक्ती ही या त्रिमूर्तींच्या केंद्रस्थानी आहे. तिच्यातील गुणांद्वारे ती त्रिमूर्तींसोबत जोडली गेली आहे. राजस गुणाद्वारे ती ब्रह्मासोबत, तामस गुणातून महेशासोबत तर सत्वाद्वारे विष्णूशी जोडली गेली आहे. त्यामुळे शक्ती म्हणजे ब्रह्मदेवाची नवनिर्माण ऊर्जा, विष्णूची बुद्धिमत्ता आणि महेशाची संहारक ऊर्जा यांचा संगम आहे. म्हणून शक्ती ही अशी स्वयंनिर्मित गोष्ट आहे जी कधीच कोणी निर्माण करू शकत नाही आणि नष्ट देखील करू शकत नाही.

           अशा या आदिशक्तीचेच एक रूप म्हणजे दुर्गा किंवा महिषासुरमर्दिनी! महिषासुर या दैत्याचा विनाश करण्यासाठी सर्व देवांनी दुर्गेला पाचारण केले. देवी व दैत्यामध्ये ९ दिवस आणि ९ रात्री युध्द चालले आणि दहाव्या दिवशी दुर्गेने महिषासुराचा वध केला आणि सृष्टीला अंतापासून वाचवले. देवीने दैत्याचा संहार केला या घटनेची आठवण म्हणून आपण नवरात्री किंवा दुर्गा पूजेचा उत्सव साजरा करतो आणि या आदिशक्तीची उपासना करतो. संपूर्ण भारतात तसेच नेपाळ व बांगलादेश येथे अनेक वर्षांपासून हा उत्सव साजरा केला जात आहे. या नऊ दिवसांमध्ये दुर्गेसोबतच महालक्ष्मी आणि सरस्वती या देवींचे पण पूजन केले जाते. ठिकठिकाणी अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी देवीची स्थापना केली जाते आणि विजयादशमीच्या दिवशी त्यांचे विसर्जन करतात.

           सिंह किंवा वाघावर आरूढ अष्टभुजा दुर्गादेवी म्हणजे विश्वजननीने अन्याय आणि वाईट प्रवृत्त्तीचा संहार करून जगाचे संरक्षण करण्यासाठी धारण केलेला उग्र अवतार आहे. तिच्या आठ हातांमध्ये देवांनी तिला प्रदान केलेली अस्त्रे आहेत. शंख, चक्र,धनुष्य-बाण, ढाल-तलवार, भाला आणि फास ही आयुधे तिने हातांमध्ये धारण केली आहेत. तिची आयुधे म्हणजे स्वयंशिस्त, निस्वार्थीपणा, भक्ती, ध्यान आणि चैतन्य यांची रूपके आहेत. आयुधे म्हणजे प्रत्येक योद्ध्याचे सामर्थ्य असते. त्यामुळे बुद्धीचे उपासक दुर्गेच्या हातांमध्ये इतर शस्त्रांसोबत लेखणी देखील दाखवतात, कारण त्यांच्यासाठी लेखणी हेच शस्त्र आहे. म्हणूनच दुर्गेचे रूप हे परिवर्तनशील आहे. तसेच तिच्या चेहऱ्यावरील उग्र व तीव्र भाव म्हणजे विनाशकारी प्रवृत्तीच्या विरोधासाठी उमटलेल्या रागाचे प्रतिबिंब आहे, पण याचबरोबर ती आपल्या भक्तांसाठी उदार आणि दयाळू आहे.

           व्युत्पत्तीशास्त्रानुसार 'दुर्गा' या शब्दाचा अर्थ आहे 'अगम्य' किंवा ‘अजिंक्य'! आपल्यासाठी दुर्गा म्हणजे केवळ पौराणिक देवता नसून एक संज्ञा आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या राष्ट्राला एकत्र जोडणारे गीत 'वंदे मातरम'! स्वातंत्र्य चळवळीच्या काळात लिहिल्या गेलेल्या या गीतामागील प्रेरणासुद्धा दुर्गाच होती. तसेच आपण आपल्या जन्मभूमीला 'भारत माता' असे संबोधतो, ही धर्मनिरपेक्ष संज्ञा आहे. कारण आपली 'भारत माता' म्हणजे केवळ हिंदूच नाही तर भारतभूमीवरील सर्व लोकांचे संरक्षण करणाऱ्या 'जगत्तारिणी दुर्गा' या रुपावरच आधारित आहे. प्रखर दुर्गा असो किंवा शांत सरस्वती, संपन्न लक्ष्मी असो किंवा तेजस्वी भारत माता, या सर्व रूपांच्या मागची संकल्पना एकच ती म्हणजे -- 'संरक्षक सार्वभौम आदिशक्ती'!. अशा अद्वितीय संकल्पनेतूनच आपल्याला भारतीय संस्कृतीच्या श्रेष्ठत्वाची जाणीव होते.

           याचबरोबर देवी ही एका महत्वाच्या गोष्टीचे प्रतीक आहे, ते म्हणजे 'सृजनाचे'! सर्जनशीलता म्हणजे या विश्वातील प्रबळ गोष्ट आहे. शौर्य, बुद्धिमत्ता, कला, ऐश्वर्य आणि सौंदर्य यांचा मिलाफ असलेली तसेच वाईट प्रवृत्तीचा नाश करून विश्वाला नवजीवन देणारी देवी म्हणजे मूर्तिमंत सर्जनशीलता! म्हणूनच नवरात्री हा सृजनाचा-सर्जनशीलतेचा उत्सव व्हावा, असे आपल्या पूर्वजांना वाटले असेल. त्यामुळे प्रत्येकानी आपल्यातील सर्जनशीलतेचे चैतन्य जागृत ठेवणे म्हणजेच या आदिशक्तीचीची खऱ्या अर्थाने केलेली उपासना!



                                                                                                 सलील सावरकर- +६५ ८४३६०३४३

अनुजा जोगदेव- +९१ ८९७५७६७५९९





No comments:

Post a Comment