Friday, 29 September 2017

विजयादशमी

विजयादशमी

                नवरात्र संपत आले की चाहूल लागते ती पुढे येणाऱ्या सणासुदीच्या मोसमाची..पावसाळा जवळ जवळ संपत आला आहे आणि त्याचबरोबर शेतीचा हंगाम देखील पूर्ण होत आला आहे. त्यामुळे आता पुढच्या मोठ्या सणासाठी आपण सगळेच सज्ज होत आहोत..अशावेळी पुढे येणाऱ्या चैतन्यपूर्ण उत्सवाची सुरुवात करून देण्यासाठी म्हणून जो महत्वाचा व आनंददायी दिवस येतो, तो म्हणजे अश्विन शुद्ध दशमी अर्थातच दसरा किंवा दशहरा !  
                 आजचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो पण सर्वांत विलक्षण बाब अशी आहे  की, दसरा हा एकमेव सण आहे की जो रामायण आणि महाभारत या दोन्ही काव्यातील महत्वाच्या घटनांसोबत गुंफला गेला आहे. आजच्या दिवशी श्री रामचंद्रांनी घनघोर युद्ध करून रावणाचा वध केला आणि अशाप्रकारे वानरसेनेचा विजय झाला. याचबरोबर दसऱ्याच्याच दिवशी पांडवांचा एक वर्षाचा अज्ञातवास संपला. आपला अज्ञातवास यशस्वीपणे पार पडल्यावर त्यांनी शमी वृक्षाच्या ढोलीत लपवलेली आपली शस्त्रे पुन्हा धारण केली. या दोन्ही घटना फारच परिवर्तनकारक ठरल्या. कारण रावणवधानंतर लंकेतील युद्धाची सांगता झाली व राम वनवास संपवून अयोध्येस परत जायला निघाले आणि पांडवांचा अज्ञातवास संपल्यानंतर काही काळातच कुरुक्षेत्राचे महायुद्ध झाले, त्यामुळे पुन्हा शस्त्र ग्रहण ही अप्रत्यक्षपणे युद्धाची नांदीच ठरली.
                     यांचबरोबर अशा अनेक कथा आहेत, ज्या दसऱ्याच्या दिवसासोबत जोडल्या गेल्या आहेत. आज दुर्गादेवीने महिषासुराचा वध केला आणि सृष्टीला नवजीवन दिले. दक्षिण भारतात या देवीला चामुंडा किंवा चामुंडेश्वरी असे म्हणतात. महिषासुर वधानंतर घटस्थापनेला बसलेल्या देवींचे विसर्जन होऊन नवरात्रीची सांगता होते. तसेच याच दिवशी आपण सरस्वती पूजन देखील करतो. याचबरोबर असे म्हणतात कि आजच्याच दिवशी कुबेराने कौत्साच्या विनंतीवरून अयोध्येबाहेर सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला.   त्या मुद्रा ज्या भागात पडल्या होत्या त्याच्या आजूबाजूस आपट्याची झाडे होती. म्हणून आजच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची प्रथा पडली आहे.
                      शिवाजी महाराजांच्या काळात या दिवशी त्यांचे मावळे शेतीची कामे आटपून पुन्हा सैन्यात सामील होत असत. कारण चार महिन्यांचा पावसाळा संपल्यावर दसऱ्याच्या दिवशी युद्ध मोहिमांना पुन्हा सुरुवात होत असे. त्यामुळे पूर्वीच्या काळी राजांच्या दृष्टीने हा दिवस त्याच्या सामर्थ्य प्रदर्शनासाठी महत्वाचा असायचा कारण याच दिवशी 'सीमोल्लंघन' केले जात असे. अशा निरनिराळ्या घटनांचे एकत्रितरित्या महत्व लाभल्यामुळे भारतभर हा दिवस महत्वाचा मानला जातो. मग तो  दिल्लीतील भव्य रावण दहन सोहळा असो अथवा म्हैसूरच्या चामुंडेश्वरीची राजेशाही थाटातील मिरवणूक, आजचा दिवस हा शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक असल्यामुळे मोठ्या दिमाखात साजरा केला जातो.
                  दसऱ्याच्या दिवसाचा आणखी एक पैलू म्हणजे महाराष्ट्रात दशमीच्या दिवशी तर दक्षिण भारतात नवमीच्या दिवशी केले जाणारे आयुध पूजन! सैनिकांची शस्त्रे, कामगारांची अवजारे, तंत्रज्ञांची यंत्रे  किंवा लेखकांची लेखणी, ही सर्वच आयुधे म्हणजे त्या त्या व्यक्तींचे सामर्थ्य आहे. आपल्यातील गुणांना आणि  विचारांना मूर्त स्वरुपात आणण्यासाठी ही आयुधेच फार मोलाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे अशा आयुधांच्या प्रति आदर आणि कृतज्ञता दर्शविण्यासाठी म्हणून ही पूजा करतात.
                   दसरा या शब्दाची व्युत्पत्ती पहिली तर ती आहे 'दश'- ‘हरा' ; म्हणजे दुष्ट प्रवृत्तींचा विनाश  आणि  अर्थातच चांगल्या गोष्टींचा वाईट प्रवृत्तींवर विजय, म्हणून या दिवसाला 'विजयादशमी' असेदेखील संबोधले जाते. आजच्या दिवशी सांगितली जाणारी राम-रावणाची गोष्ट म्हणजे विजयादशमीचा पाया आहे. खोलात विचार करून पहिले तर असे वाटते की राम आणि रावण ही दोन विचारधारांची प्रतीके आहेत. ह्या दोन व्यक्तीरेखा म्हणजे मानवी मनाच्याच दोन बाजू आहेत. राम म्हणजे चांगुलपणा आणि सद्विवेक बुद्धी तर रावण म्हणजे खल मनोवृत्ती आणि अहंकार! आपण कोणीच परिपूर्ण नसतो, त्यामुळे आपल्या मनात राम आणि रावण कायमच वास करत असतात, पण महत्वाचे हे आहे की आपण कोणती बाजू स्वीकारतो! राम रावणाच्या गोष्टीत ज्याप्रमाणे राम रावणाचा वध करतो त्याचप्रमाणे स्वतःमधील चांगल्या गुणांची कास धरून स्वतःच्याच दुर्गुणांवर मात करणे म्हणजेच खरी विजयादशमी! माणसाचा स्वतःच्या सद्विवेकबुद्धीवरचा विश्वास टिकून राहावा या कारणासाठी म्हणून दसरा हा सण महत्त्वाचा आहे.
                       आमच्या सर्व वाचकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या सर्वांच्याच आयुष्यात खऱ्या अर्थाने विजयादशमी साजरी होऊदेत हीच आमची सदिच्छा!

                                                                                                        सलील सावरकर- +६५  ८४३६०३४३
   अनुजा जोगदेव-  +९१ ८९७५७६७५९९

  

2 comments: