Tuesday, 17 October 2017

ज्योतीने तेजाची आरती!

         

       
          'दिवाळी'...हा शब्द कानावर पडल्याक्षणी आपल्या सर्वांची मने उत्साहाने आणि चैतन्याने भरून येतात! दिवाळीचे दिवस म्हणजे वर्षातील सर्वात मंगलमय आणि प्रकाशमान दिवस असतात. हा भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारा सण आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात अनेक ठिकाणी भारतीय वंशाचे लोक दिवाळी साजरी करतात. वर्षानुवर्षे साजऱ्या केल्या जाणाऱ्या या सणासोबत अनेक घटनाचे धागे गुंफले गेले आहेत, ज्यांच्यामुळे भारतीय उपखंडात दिवाळी साजरी होऊ लागली.
           पूर्वीपासून भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे अर्थातच आपले सण शेतीच्या हंगामावर निगडीत असत. अश्विन महिन्याच्या अखेरीस शेतीचा पहिला हंगाम संपलेला असायचा आणि धान्याची रेलचेल असायची. अशाप्रकारे आर्थिक स्थैर्य आल्यामुळे लोकांमध्ये सण साजरा करायचा उत्साह आलेला असायचा. याचबरोबर भारतातील वेगवेगळ्या प्रांतात दिवाळीशी निगडीत निरनिराळ्या पौराणिक कथा सांगितल्या जातात. त्यामुळे शेतीच्या सुबत्तेच्या दिवसांना धार्मिक जोड मिळाल्यामुळे भारतभर दिवाळी अगदी उत्साहात साजरी केली जात असे आणि आताही तीच परंपरा कायम आहे.
           असे म्हणतात, की दिवाळीची सुरुवात रामायणापासून झाली. विजयादशमीला रावणवध करून श्रीराम अयोध्येला परत आले. यानंतर अयोध्यावासियांनी नगरात दीप प्रज्वलीत करून आपला आनंद साजरा केला आणि अशाप्रकारे दरवर्षी दिवाळीची परंपरा सुरु झाली. नंतर काळानुसार यात नवीन कथांची आणि प्रथांची भर पडत गेली.
           आता आपल्याकडे वसुबारस म्हणजे गोवत्सद्वादशीपासून ते भाऊबीज म्हणजे यमद्वितीयेपर्यंत अशी आठवडाभर दिवाळी साजरी करतात. यातील प्रत्येक दिवसाला निराळे महत्त्व आहे आणि प्रत्येक दिवसासंदर्भात निरनिराळे युक्तिवाद आहेत. जसे की, गोवत्सद्वादशीला गाय-वासराची पूजा केली जाते. कारण शेतीबरोबरच जोड व्यवसाय म्हणजे पशुपालन त्यात मुख्यत्वे गायी, त्यामुळे त्यांच्याप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा तो दिवस आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी समुद्रमंथनातून 'धन्वंतरी' म्हणजे देवांचा वैद्य आणि 'लक्ष्मी' यांचा जन्म झाला असे मानतात. त्यामुळे यादिवशी या दोन्हींचे पूजन करण्याची प्रथा सुरु झाली. दीपावलीचे प्रमुख दोन दिवस म्हणजे नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन! भागवत पुराणानुसार अश्विन वद्य चतुर्दशीला श्रीकृष्णाने स्वर्ग आणि पृथ्वी वर राज्य करणाऱ्या नरकासुराचा वध केला. त्यामुळे सर्व देवांची आणि मानवांची या दुष्ट असुरापासून सुटका झाली. या विजयाची आठवण म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. याचबरोबर अश्विन अमावास्येच्या दिवशी सायंकाळी विष्णु-लक्ष्मी यांचा विवाह संपन्न झाला. तसेच असे मानतात, की या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी आपल्या भक्तांना भेटायला त्यांच्या घरी जाते म्हणून या दिवशी लक्ष्मीपूजन करण्याची प्रथा पडली. त्या अमावास्येनंतर नव्याने उगवणारा चंद्र घेऊन येणारी कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा! उज्जैनच्या विक्रमादित्य राजाने या दिवसापासून विक्रम संवत्सर सुरु केले. विक्रमादित्याच्या पराक्रमाची आठवण म्हणून त्याच्या प्रजेने दिवाळी साजरी करण्यास सुरुवात केली असेही मानले जाते. याचबरोबर असे म्हणतात, की वामनावतारातील विष्णूंनी पाताळात धाडलेला बळी राजा आजच्या दिवशी त्याच्या प्रजेला भेटायला येतो. म्हणून या दिवसाला बलिप्रतिपदा म्हणतात. त्यामुळे या दिवशी काही ठिकाणी बळीराजाची पूजा केली जाते. अशा वैशिष्ट्यपूर्ण पौराणिक कथा म्हणजे दिवाळीचे रंजक पैलू आहेत.
           आश्चर्याची बाब अशी की, ह्या सर्व दिवसांच्या कथा या एकमेकांशी संबंधित नाहीत, परंतु हे सर्व दिवस एकत्र मिळून जी होते ती दिवाळी! कारण दिवाळी म्हणजे केवळ एका दिवसाचा सण नाही तर संपूर्ण आठवडाभर चालणारा आनंदाचा उत्सव आहे. तसेच दीपावलीची एक अशी परंपरा आहे, जी यातील प्रत्येक दिवशी पाळली जाते ती म्हणजे सायंकाळी घराबाहेर दिवे किंवा पणत्या लावणे. कारण दीपावली या शब्दाची व्युत्पत्तीच आहे, 'दीप’-'आवली'...म्हणजे अंधःकाराचा विनाश करण्यासाठी प्रज्वलित केलेल्या दिव्यांच्या ओळी! गोमाता, धन्वंतरी, विष्णु, लक्ष्मी किंवा महाबली यापैकी कोणाचेही पूजन असले तरी आपण रोज सायंकाळी पणत्या लावतो. कारण दिवाळी हा खरेतर प्रकाशाचा आणि तेजाचा सण आहे. पंचमहाभूतांपैकी एक तत्व म्हणजे अग्नी किंवा तेज! आपण भारतवर्षातील लोक हे अग्नीचे उपासक आहोत. आपल्या संस्कृतीत अग्नी ही सर्वात पवित्र गोष्ट समजली जाते. तसेच तेज तत्वाशी निगडीत असलेले मणिपूर चक्र म्हणजे बुद्धिमत्ता आणि शक्ती यांचे प्रतीक मानले जाते. अशा या अग्नीचे व तेजाचे प्रतीक असलेला दीप प्रज्वलित करणे म्हणजे अंधःकार दूर करणे आणि प्रकाशाकडे वाटचाल करणे. पौराणिक कथा हे एक निमित्त झाले, पण दिवाळीच्या पणत्या ह्या केवळ बाहेरचा काळोखच नाही तर आपल्या अंतःकरणातील अंधःकार दूर करण्यासाठी असतात...मग तो अंधार कोणताही असो, अज्ञानाचा, अन्यायाचा किंवा असत्याचा! हा अंधःकार नष्ट झाला तरच आपली प्रगती होऊ शकते. दिवाळीच्या निमित्ताने 'प्रकाशाचा उत्सव' ही संकल्पना भारतीय संस्कृतीत रुजवणाऱ्या आपल्या पूर्वजांची बुद्धीमत्ता खरोखरच अलौकिक आहे.
           आमच्या सर्व वाचकांना दिवाळीच्या तेजोमयी शुभेच्छा!! या दिवाळीला लक्ष लक्ष पणत्यांच्या ज्योतींनी आपण या विश्वातील तेजाचे पूजन करून आपल्या मनातील अंधःकार दूर करू...तमसो मा ज्योतिर्गमय!
                                                                                                  सलील सावरकर- +६५ ८४३६०३४३
अनुजा जोगदेव- +९१ ८९७५७६७५९९



No comments:

Post a Comment